गुजरातचा ऊस साखर देतो तर महाराष्ट्राचा ऊस मीठ देतो का???

गुजरातच उस साखर देतो तर महाराष्ट्राचा उस मीठ देतो का::बच्चू कड़ूचा सरकारला सवाल
शेतकऱ्यांची कर्जमुक्ती न झाल्यास रेल्वे धावू न देण्याचा गर्भित इशारा
जिंतूरच्या भव्य शेतकरी परिषदेत सरकारवर कडाडून टीका; १ जुलैचा इशारा
जिंतुर::शेतकऱ्यांची तात्काळ कर्जमुक्ती केली नाही तर १ जुलैपासून रेल्वे धावू देणार नाही, असा थेट इशारा प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी जिंतूर शहरातील दादा शरीफ चौक येथे आयोजित भव्य शेतकरी, शेतमजूर व दिव्यांग परिषदेत दिला.
या परिषदेतून त्यांनी केंद्र व राज्य सरकारवर जोरदार शब्दांत टीका केली.बच्चू कडू पुढे बोलताना म्हणाले की, “आम्ही शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरलो आहोत. मात्र या लढ्यात शेतकऱ्यांनी एकजुटीने आमच्यासोबत उभे राहिले पाहिजे.” पश्चिम महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये उसाला वेगवेगळा दर मिळतो.गुजरातमध्ये उसाला ४७०० रुपये दर मिळतो, तर महाराष्ट्रात उसाला कमी दर मिळतो, याकडे त्यांनी लक्ष वेधले. “गुजरातचा ऊस साखर देतो आणि महाराष्ट्राचा ऊस मीठ देतो का?” असा सवाल उपस्थित करत माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या साखर कारखान्यात उसाला २४०० रुपये दर दिला जात असतानाही शेतकरी त्यांनाच निवडून देतात, अशी टीका त्यांनी केली.
भाजप सरकारने कापूस, सोयाबीन, तूर, केळी यासह कोणत्याही शेतीमालाला योग्य भाव दिला नाही, असा आरोप करत बच्चू कडू म्हणाले की, भाजप सरकारने शेतकऱ्यांचे आंदोलन वर आले नाही पाहिजे या साठी आंदोलनावर कोट्यवधी रुपये खर्च करण्याचे ठरवले आहे.
“भाजप हिंदूंना, काँग्रेस मुस्लिम व दलितांना हाताशी धरते, या राजकीय लढाईतून शेतकऱ्यांना बाहेर काढणे कठीण झाले आहे,” असे म्हणत त्यांनी सरकारवर कडाडून टीका केली.
या परिषदेत ऑल इंडिया पँथर सेनेचे दीपकभाई केदार यांनीही सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.
“३१ जूनपर्यंत कर्जमुक्ती झाली नाही तर नागपूरचे आंदोलन ही फक्त झाकी असून पुढचे आंदोलन अधिक तीव्र असेल,” असा इशारा त्यांनी दिला. चंद्रपूर जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने एक लाख रुपये कर्ज घेतले असता त्यावर तब्बल ७४ लाख रुपयांचे व्याज लावण्यात आले.
त्यामुळे त्या शेतकऱ्याला मूत्रपिंड विकावे लागले, तरीही राज्याचे मुख्यमंत्री साधा ट्विट करत नाहीत, अशी संतप्त टीका त्यांनी केली.
राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनीही सरकारच्या धोरणांवर टीका करत शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला.
ही परिषद शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी व दिव्यांग यांच्या ज्वलंत प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आयोजित करण्यात आली होती. या परिषदेतून येलदरी धरणातून जिंतूर तालुक्यासाठी स्वतंत्र कालवा काढण्यात यावा, शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती करून सातबारा कोरा करावा, करपरा-दुधना नदी तसेच तालुक्यातील ओढे-नाल्यांचे सरळीकरण, रुंदीकरण व खोलीकरण करावे, २०२० पासून रखडलेला पीक विमा तात्काळ द्यावा, रानटी प्राण्यांमुळे होणाऱ्या नुकसानीवर तातडीची उपाययोजना करावी, तसेच पाटबंधारे विभागाने कालवे व चाऱ्यांची दुरुस्ती करावी, अशा अनेक मागण्या मांडण्यात आल्या.
या कार्यक्रमाला प्रशांत डिक्कर, रविंद्र इंगळे, माधुरी क्षीरसागर, प्रा. प्रफुल्ल भोजने, अमृतदादा शिंदे, माणिक कदम, अच्युत रसाळ, शिवलिंग बोंधने, अशोक हाके, विनोद भोळे, विश्वंभर गोरवे, बाळासाहेब आळणे, पांडुरंग लांडगे, लिंबाजी कचरे, हनुमान आमले, हेमचंद्र शिंदे, शरद चव्हाण, भागीरथ मिरासे, माधव दाभाडे, माधव खरात, सचिन राठोड, प्रसाद गोरे, ओंकार पवार, रामप्रसाद माघाडे, माऊली निरवळ, रामकिसन घाटोळ, सोपान मोरे, रमाकांत गोरे, कृष्णा राऊत, दगडूबा वजीर, दीपक कास्टे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माणिक कदम यांनी केले. प्रास्ताविक इरशाद पाशा चांद पाशा पिंपरीकर यांनी मांडले.
तर आभार सचिन राठोड यांनी मानले. दुधगाव महसूल मंडळासह जिंतूर तालुक्यातील शेकडो शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या परिषदेचे आयोजन दुधगाव महसूल मंडळ, जिंतूर तालुका शेतकरी संघर्ष समिती यांच्या वतीने करण्यात आले होते.



