राष्ट्रसंत ललितप्रभजी यांच्या प्रवचनास अभूतपूर्व प्रतिसाद

राष्ट्रसंत ललित प्रभजी यांच्या प्रवचनास अभूतपूर्व प्रतिसाद
गीता परिवाराचा भव्य चतुर्थ दर्शक पूर्ती महोत्सव : आठ ते दहा हजार विद्यार्थी सहभागी
जिंतूर::शहरातील मार्केट यार्ड येथे राष्ट्रसंत ललितप्रभजी यांचे भव्य प्रवचनात व विद्यार्थ्यांना जीवन कसे जगावे यासाठी मार्गदर्शन तसेच
गीता परिवाराच्या चतुर्थ दर्शक पूर्ती महोत्सवानिमित्त जिंतूर शहरात एक अभूतपूर्व सांस्कृतिक – आध्यात्मिक सोहळा पार पडला. सुमारे आठ ते दहा हजार विद्यार्थ्यांच्या सहभागातून सादर झालेल्या या अनोख्या कार्यक्रमाने शहराचे सांस्कृतिक वैभव उजळून निघाले. जिंतूरमधील जवळपास सर्व शाळांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत विद्यार्थ्यांना सहभागी केले.
शाळांचा व्यापक सहभाग
जवाहर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, बालक मंदिर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, जीजामाता विद्यालय, संचारेश्वर प्राथमिक विद्यालय, सिद्धेश्वर माध्यमिक विद्यालय, ऑर्किड इंग्लिश मीडियम, पोद्दार इंग्लिश मीडियम, विद्या वॅली, लेट कांताराव चिद्रवार इंग्लिश मीडियम, बोर्डीकर कन्या विद्यालय, बोर्डीकर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, सोनी इंटरनॅशनल, मोनालिसा इंग्लिश मीडियम, ज्ञानेश्वरी प्राथमिक, एकलव्य प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, जयदुर्गा आदिवासी आश्रम शाळा, वैदिक पौरोहित्य पाठशाळा, चैत्यनयोदय गुरुकुल अशा सर्व शाळांनी विद्यार्थ्यांसह भव्य उपस्थिती लावली.
कार्यक्रमाची अध्यात्ममय सुरुवात
कार्यक्रमाची सुरुवात परमपूज्य गुरुदेव श्री गोविंदगिरीजी व्यास महाराज यांच्या ऑनलाइन आशीर्वचनांनी झाली. त्यानंतर ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ या गीताने महाराष्ट्राला वंदन करण्यात आले. तसेच वंदे मातरम गीताला १५० वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने सर्वांनी एकत्र येत राष्ट्रवंदना केली.
राधाकृष्ण-गोपी यांच्या सादरीकरणांनी कार्यक्रमाला अलौकिक रंगत आली आणि प्रांगण भक्तिमय वातावरणाने भरून गेले.
एकाच वेळी आठ हजार विद्यार्थ्यांनी सादर केला गीतेचा बारावा अध्याय
दुपारी नेमके दोन वाजून तीन मिनिटांनी इतिहास घडला. जिंतूरच्या विविध शाळांतील आठ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी एकाच वेळी श्रीमद् भगवद्गीतेचा बारावा अध्याय म्हणून दाखविला. हजारो आवाजात गुंजणारा हा गीतेचा अध्याय उपस्थितांना रोमांचित करणारा आणि दृष्टीस पडेल तितका अद्भुत असा अनुभव देणारा ठरला.
महोत्सवाची सांगता आणि संस्कारांची ज्योत
कार्यक्रमाचा समारोप परमपूज्य राष्ट्रसंत श्री ललित प्रभ महाराज यांच्या आशीर्वचनांनी झाला. त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले. या आयोजनातून ‘बालपणी दिलेले संस्कार सहज अवगत होतात’ या विचाराची सुंदर प्रचिती मिळाली.
कार्यक्रमाच्या यशात सर्वांचे मोलाचे योगदान
हा भव्य कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गीता परिवाराच्या सदस्यांनी प्रत्येक शाळेत जाऊन विद्यार्थ्यांना गीतेचा बारावा अध्याय शिकविला. सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षकवर्ग यांनी संपूर्ण सहकार्य केले.
वेद विद्यालयाचे सर्व न्यासी, गुरुदेव श्री गोविंदगिरी जी चे साधक व शिष्य परिवार तसेच जिंतूर शहरातील नागरिकांनी व्यापक सहकार्य दाखविले. विशेषत: लोककल्याणकारी प्रवचन समिती आणि ब्रिजगोपालजी तोष्णीवाल यांचे योगदान उल्लेखनीय ठरले.
जिंतूरमध्ये प्रथमच एवढ्या मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी एकत्र येत गीता अध्यायाचे सादरीकरण केल्याने हा दिवस शहराच्या सांस्कृतिक इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदला जाणार आहे.



