लोकशाही जिवंत ठेवण्याचे काम पत्रकार करतात::अमृता सुरेश नागरे

लोकशाही जिवंत ठेवण्याचे काम पत्रकार करतात – अमृता नागरे
अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाच्या वतीने दिनांक ६ जानेवारी रोजी पत्रकार भवन, जिंतूर येथे मराठी पत्रकारितेचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त दर्पण दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात प्रमुख वक्त्या अमृता नागरे यांनी मार्गदर्शन करताना, लोकशाही जिवंत ठेवण्याचे महत्त्वाचे काम पत्रकार करतात असे प्रतिपादन केले.
कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून जेष्ठ पत्रकार निहाल अहेमद हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे,लक्ष्मण बुधवंत,डॉ निशांत मुंढे,शेख अहेमद, अकबर सिद्दीकी,पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष बालाजी शिंदे सोसकर,अजमत पठाण,एकनाथ चव्हाण,शेख नयमुद्दीन हे उपस्थित होते यावेळी जेष्ठ पत्रकारांचा सत्कार करून सन्मान करण्यात आला.यावेळी त्या पुढे म्हणाल्या की,आजच्या काळात सोशल मीडिया आणि एआय (कृत्रिम बुद्धिमत्ता) यांच्या माध्यमातून फोटो एडिट करून वास्तवाचे वरवरचे चित्र सादर केले जाते.
मात्र, अशा परिस्थितीतही पत्रकार सत्य, प्रामाणिकपणा आणि जबाबदारीने बातम्या मांडण्याचे आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडत आहेत, हे समाजासाठी आशादायक आहे.पत्रकारिता ही केवळ व्यवसाय नसून समाजाच्या हितासाठी केलेली जबाबदारीची सेवा आहे,असेही त्यांनी स्पष्ट केले.
दर्पण दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमात पत्रकारितेचे सामाजिक योगदान,बदलते माध्यमविश्व आणि पत्रकारांची जबाबदारी यावर सखोल चर्चा झाली.
या कार्यक्रमात पोलिस निरीक्षक गजेंद्र सरोदे यांनी पत्रकार बांधवाना शुभेच्छा देत आपले मनोगत व्यक्त केले.
उपस्थित इतर मान्यवरांनी आपले अनुभव मांडत पत्रकारितेतील आव्हाने आणि संधी यावर विचार व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शेख शकील यांनी केले तर आभार सिराज सिद्दीकी यांनी मानले
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तालुका मराठी पत्रकार संघाचे पदाधिकारी व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमास तालुक्यातील पत्रकार बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.




