शिवजयंती निमित्त निराधार विधवा ताईला उदर निर्वाहाचे साधन भेट
अंबिकावाडी येथे एचएआरसी संस्थेने राबवला स्तुत्य उपक्रम* जिंतूर--होमिओपॅथिक अकॅडमी

जिंतूर–(गुणीरत्न वाकोडे)–होमिओपॅथिक अकॅडमी ऑफ रिसर्च & चॅरिटीज (एचएआरसी) संस्थेने आज दि 18 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला अंबिकावाडी ता जिंतूर येथील राणी प्रभाकर धोत्रे या निराधार विधवा ताईस उदरनिर्वाहाचे साधन म्हणून शेळी व शेळीचे दोन पिल्ले भेट देऊन सामाजिक बांधिलकी जपली.
*पार्श्वभूमी*: जिंतूर तालुक्यातील अंबिका वाडी येथील राणी प्रभाकर धोत्रे यांच्या पतीचे अपघातात निधन झाल्याने त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. त्याच्या मृत्यूनंतर राणी धोत्रे या निराधार ताई शेतमजुरी करून बिकट आर्थिक परिस्थितीमध्ये जीवन जगत आहेत. त्या कुटुंबास स्वतःची शेती किंवा जमीन काहीही नसून शेतात मोलमजुरी करून कसेबसे त्यांच्या उदरनिर्वाहासाठी धडपड करत आहेत.
त्या निराधार विधवा ताईला एक मुलगा व एक मुलगी असून त्यातील 1 मुलगा चौथीत तर मुलगी सहावी मध्ये शिक्षण घेत आहे.
त्याच्या वडिलांच्या मृत्यूनंतर या दोन मुलांचा शिक्षणाचा प्रश्न देखील बिकट बनला आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पुंगळा चे शिक्षक प्रकाश डूब्बे यांनी त्यांच्या घरी भेट देऊन त्यांची व्यथा जाणून घेतली आणि या कुटुंबाची कैफियत एचएआरसी संस्थेकडे मांडून त्या कुटुंबास उदरनिर्वाहाचे साधन देण्यासाठी आवाहन केले.
एचएआरसी संस्थेने केलेल्या मदतीच्या आवाहनास प्रतिसाद देत वैशालीताई लोके, पवनकुमार मुंदडा, सौ मीनल मोहन बालगरकाशी, मुकेश आलेगावकर, सचिन सरकले, दीपक सराफ या दात्यांनी सहयोग दिला.
याप्रसंगी एचएआरसी संस्थेचे अध्यक्ष डॉ पवन चांडक, प्राचार्य श्रीधर भोंबे, सत्यनारायण चांडक, प्रकाश डुबे,आनंद पुंड, रवींद्र पाटील, सचिन पुंड,खुशबू पाटील व गावातील नागरीक उपस्थित होते.
*पतीचे निधन झाल्यामुळे 2 मुलांचा सांभाळ करण्याची जबाबदारी एकटीवर आली, स्वतःचे घर, शेती नसल्यामुळे आर्थिक परिस्थिती बिकट रोज मजुरी करून संसार चालवत असते, आज मला शेळी व शेळीचे दोन पिल्ले या स्वरूपात मदत मिळाल्याने मी आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी होणार असल्याची भावना यावेळी महिलेने व्यक्त केली.* – राणी प्रभाकर धोत्रे