कौसडीच्या जि.प. प्रशाला शाळेने मानवी साखळीतून अवतरले छत्रपती शिवराय
तब्बल 995 विद्यार्थ्यांच्या सहभागातून शिवरायांना अनोखी मानवंदना

जिंतूर—तालुक्यातील कौसडी येथील जि प प्रशाला कौसडी ता.जिंतूर जि.परभणी शाळेच्या मैदानावर श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने विद्यार्थ्यांच्या माध्यमातून मानवी साखळीद्वारे भव्यदिव्य अशी प्रतिकृती प्रशालेच्या प्रांगणात साकारण्यात आली.
गावातील जि.प.प्रशाला कौसडी,केंद्रीय प्राथमिक शाळा कौसडी,प्राथमिक ऊर्दू शाळा कौसडी,कन्या शाळा कौसडी, संत तुकाराम ऊर्दू माध्यमिक शाळा कौसडी,प्राथमिक शाळा बसवेश्वर नगर,स्कॉलर इंग्लिश स्कूल गुळखंड फाटा व सर्व कौसडी येथील अंगणवाडी असे एकूण तब्बल ९९५ विद्यार्थ्यांच्या मानवी साखळीतून साकारून अनोखी मानवंदना देण्यात आली.भूतो न भविष्य डोळ्याचे पारणे फेडणारी तब्बल ९९९५ स्क्वेअर फुटातील कलाकृती प्रसिद्ध रंगोळीकार श्री.ज्ञानेश्वर आप्पाराव बर्वे यांनी
अथक परिश्रम घेऊन तयार केली.श्री.बर्वे सरांना प्रतिमा साकारण्यासाठी सर्व शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक,शिक्षिका शालेय समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य,अंगणवाडी सेविका या सर्वांनी सहकार्य केले.छत्रपती शिवाजी महाराज यांची भव्यदिव्य प्रतिकृती पाहून कौसडी गावांतील प्रत्येकाला शिवबाच्या महाराष्ट्रात जन्माला आल्याचा सार्थ अभिमान वाटत होता.
या प्रसंगी कौसडी केंद्राचे केंद्रप्रमुख श्री.प्रकाश पांडे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन केले.तसेच श्री.ज्ञानेश्वर बर्वे यांचा सत्कार कौसडी गावचे सरपंच,अध्यक्ष,उपाध्यक्ष,उपस्थित ग्रामस्थ,पत्रकार यांनी केला.त्याचबरोबर मानवी साखळीतून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिकृतीचे चित्रीकरण ड्रोन कॅमेरा द्वारे करण्यात आले.